महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पुलाचा मोठा भाग कोसळल्याची घटना बुलडाण्याच्या सिंदखेडराजा जवळ घडली आहे. कोसळलेल्या पुलाखाली एक ट्रक देखील दबला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकार्पणाच्या घाईमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आठवड्याभरात समृद्धी महामार्गाची ही दुसरी दुर्घटना आहे.
सुरक्षा रक्षकाने प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रात्री 1-2 वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. बांधकाम सुरू असताना एक मोठा गर्डर 80 फुटावरून खाली कोसळला. दोन डोंगराळ भागाला जोडणारा हा पुल असून 500 मीटर इतकी त्याची लांबी आहे. या पुलाला सुमारे 150 पीलर आहेत. काम सुरू असताना पुलाचे निर्माण करणारे मजूर बाजूला गेल्यानंतर ही घटना घडली. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
समृध्दी महामार्गाच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला होता. पण आता लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. समृध्दी महामार्गाचे उद्धाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते 2 मे रोजी होणार होते. पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा 240 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडले असल्याचे माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नागपूरपासून 15 किमी अंतरावर वन्यजीवांसाठी पासिंग रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यात काही चुका असल्याने रस्त्यात काही दुरुस्त्या करण्यात येणार आहे. हे काम दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. यामुळे लवकरच मार्गाचे लोकार्पणाच्या नवी तारीख कळवण्यात येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.