महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । युक्रेन युद्धाच्या संकटामुळे गाडी चालवणे महाग झाले असतानाच आता घर बांधणेही महाकठीण होणार आहे. आयातीत कोळसा आणि पेट्रोलियम कोळशासारख्या कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतर पुढच्या एका महिन्यात सिमेंटचे भाव ६ ते १३ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता आहे. सिमेंटचे एक पोते ४०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
सिमेंट उद्योगातील जाणकारांनुसार गेल्या सहा महिन्यात कोळसा आणि पेट्रोलियम कोळशाचे दर ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. क्रिसिलचा एक अहवाल सांगतो की, गत एक वर्षात सिमेंटच्या एका पोत्याचे भाव वाढून ३९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पुढील एका महिन्यात देशभर सिमेंटचे दर आणखी २५ ते ५० रुपयांनी वाढू शकतात. कारण कंपन्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याच्या बेतात आहेत.
खरतर क्लिंकरच्या उत्पादनासाठी कोळसा आणि पेट्रोलियम कोळशाची गरज असते. हा सिमेंट उद्योगासाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल. सिमेंट कंपन्यांनुसार पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे संकट आणखी वाढले आहे. पॅकेजिंग मटेरियल्सवरील खर्च, वाहतूक खर्च आणि वितरणखर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंपन्यांचे म्हणणे असे की, गेल्या आर्थिक वर्षात ब्रेंट क्रूड ७५ टक्क्यांहून जास्त महाग झाले आहे. त्यामुळे जानेवारी-मार्च या तिमाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम कोळशाचे दर सरासरी ४३ टक्क्यांनी वधारले. सिमेंटच्या वाढत्या दराचा परिणाम थेट बांधकाम क्षेत्रावर होणार आहे. कारण आधीच स्टीलचे भाव वाढल्यामुळे बांधकाम क्षेत्र जेरीस आले आहे.
या आर्थिक वर्षात मागणीत मंदी असेल
क्रिसिल रिसर्चचे डायरेक्टर हेतल गांधी यांच्या मते, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सहामाहीत सिमेंटची मागणी २०% नी वाढली होती. पण अवकाळी पाऊस, वाळूची कमतरता आणि मजुरांची टंचाई यामुळे दुसऱ्या सहामाहीत ती मंदावली. यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षातील मागणीतील वाढ केवळ ७ टक्क्यांवर आली आहे. गांधींच्या म्हणण्यानुसार, २०२२-२३ मध्ये वाढीव किंमतीमुळे मंदी असेल. या कालावधीत सिमेंट विक्री ५-७ % नी वाढू शकते.