आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे ही अतिशय गंभीर घटना आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका व्यक्तीने केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण

जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. याबद्दल मला माहिती नाही. रात्री मी झोपलेला असतो. त्या दिवशी देखील मी दिवसभर माझ्या विभागात काम केल्यामुळे घरी येऊन झोपलो होतो, असं आव्हाडांनी सांगितलं. याउलट डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर माझ्या घराची रेकी करण्यात आली होती. त्या रेकीच्या वेळी आणि दाभोळकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षपणे या तरुणाचा हात असल्याचा दाट संशय आहे. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली होती, तशी पोस्ट कोण सहन करणार नाही. माझा नग्न फोटो या मुलाने टाकला होता, असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? तसेच हे भाजपचे नेते तरी सहन करतील का? अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी ‘एबीपी माझा’ ला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *