केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले.यावेळी केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. केशरी शिधापत्रिकांधारकांना 8 रुपये प्रती किलो गहू आणि 12 रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख केशरी शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल. त्यासाठी सुमारे 250 कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल. सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्या व्यतिरिक्त 1 लाख 54 हजार 220 मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे.

भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्याबाबत परिस्थिती पाहून योग्यवेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा 5.50 लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे ,अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *