मुंबईत सीएनजी दरात पुन्हा चार रुपये वाढ, महिन्यातील तिसरी दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.३० एप्रिल । संपूर्ण महामुंबई परिसरात घरगुती पाइप गॅस व वाहनांसाठी सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. सीएनजी चार रुपये प्रति किलोने महाग करण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. याद्वारे सीएनजी २९ दिवसांत १६ रुपयांनी महागले आहे. सुदैवाने पाइप नैसर्गिक वायूचे (पीएनजी) दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. ही या महिन्यातील तिसरी दरवाढ आहे.

मुंबईत सर्वाधिक संख्येने धावणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सी, अॅपआधारित कॅब यांचा खिसा आता आणखी हलका होणार आहे. या वाहनांमध्ये लागणाऱ्या सीएनजी दरात महानगर गॅसने ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ११.४३ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर व्हॅटमधील कपातीमुळे १ एप्रिलपासून सीएनजी ६ रुपये प्रति किलोने स्वस्त झाले. वाहनचालकांसाठीचा हा दिलासा अल्पकाळ ठरला. ६ एप्रिलपासून एमजीएलने सीएनजी तब्बल ७ रुपये प्रति किलोने महाग केले. त्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा ५ रुपये व आता ४ रुपये प्रति किलोने दर वाढविण्यात आले आहेत. यामुळे आता सीएनजीचे नवे दर तब्बल ७६ रुपये प्रति किलो असतील.

महानगर गॅसने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘१ एप्रिल २०२२ पासून देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या विक्रीच्या किंमतीत केंद्र सरकारने ११० टक्क्यांची वाढ केली. शिवाय, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या उपलब्धतेतील कमतरता भरून काढण्यासाठी ‘री-गॅसिफाइड’ द्रवरूप नैसर्गिक वायू मिश्रित केला जात आहे. या द्रवरूप वायूचे दर महागल्याचादेखील परिणाम झाला आहे. त्यामुळेच किंमतीत वाढ करावी लागली आहे.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *