रशियाचा क्रूरपणा जगासमोर, युक्रेनमध्ये सापडली नवी दफनभूमी, मृतदेहांचा खच

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.३० एप्रिल । युद्धभूमी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये आणखी एक दफनभूमी आढळली आहे. यात ९०० मृतदेह असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. या माध्यमातून झेलेन्स्की यांनी रशियाचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ऑनलाइन न्यूज पोर्टल उक्रेइंस्का प्रावदाच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी पोलंड मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, ज्या भागात दफनभूमी सापडली आहे, तो भाग रशियाच्या फौजांनी मार्चमध्येच ताब्यात घेतला होता. किती लोक मारले गेले आहेत, हे कुणालाच माहिती नाही, असंही झेलेन्स्की यांनी या मुलाखतीत सांगितलं.  

‘या प्रकरणाची सर्वप्रथम चौकशी होईल. त्यानंतर अहवाल दिला जाईल. त्यानंतर जनगणना होईल’, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. या सर्व लोकांचा शोध घ्यायचा आहे. पण हा आकडा किती आहे, कोण होते, हे आम्हाला ठाऊक नाही, असंही ते म्हणाले. २४ फेब्रुवारीला युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमधील जवळपास पाच लाख नागरिकांना रशियामध्ये पाठवण्यात आलं, असा दावाही त्यांनी केला. युक्रेनच्या नागरिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील दोषी रशियन सैनिकांचा युक्रेनचे अधिकारी आणि वकील शोध घेतील आणि त्यांच्याविरोधात खटले दाखल करणार आहेत, असंही झेलेन्स्की यांनी सांगितलं. (Russia Ukraine War)

युक्रेनच्या सरकारी वकिलांनी १० रशियन सैनिकांची ओळख पटवलेली आहे. या सैनिकांनी बूचामध्ये युक्रेनियन नागरिकांची हालहाल करून हत्या केली होती. बूचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी २३ एप्रिलला यासंबंधी दावा केला होता. रशियन सैनिकांनी हत्या केलेल्या ४१२ नागरिकांचे मृतदेह किव्ह शहरापासून जवळपास ३१ किलोमीटरवरील परिसरात दफनभूमीत आढळले होते, असे त्यांनी सांगितलं होतं. या घटनांचा तपास करणाऱ्या यंत्रणांना आतापर्यंत दफनभूमींमध्ये जवळपास ११०० मृतदेह आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *