मनसे 4 मेच्या अल्टीमेटमवर ठाम : अक्षय्य तृतीयेनिमित्त मनसेतर्फे राज्यभरात ‘महाआरती’चे आयोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.२ मे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद मधील सभा चांगलीच वादळी ठरली. अपेक्षेप्रमाणे राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. 4 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवतील असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानंतर आता अक्षय्य तृतीया निमित्त मनसेच्या वतीने राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे दादर मधील प्रभादेवी मंदिरात महाआरती करतील. तसेच राज्यभर विभागानुसार महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे आणि नंतर औरंगाबाद मध्ये सभा घेत आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज ठाकरे असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

महाविकासआघाडी मधील सर्वच नेते मंडळी राज यांच्या भाषणावर टीका करत आहे. राज ठाकरे यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार यांना ‘हिंदुत्त्व’ या शब्दाचीच अ‍ॅलर्जी असल्याचे म्हटले होते. आता राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला घेरणार असल्याचं दिसून येतंय. मनसेच्या वतीने राज्यभर विभागवार महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *