महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे। अखेर अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधत फळांचा राजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Mango Arrival) आंब्याची आवक होते की नाही अशी स्थिती होती. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यातील (Hapus Mango) हापूस आंबा आता मुंबई, पुणे यासारख्या बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत (Mumbai Market) मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल 6 लाख 29 हजार 237 पेट्या ह्या कोकण आणि अन्य राज्यातून दाखल झाल्या आहेत. आवक वाढली की दरात घट हा बाजारपेठेचा नियमच आहे. पण हापूस आंबा याला अपवाद राहणार आहे. कारण फळांचा राजा असलेल्या हापूसचे आगमन उशिरा तर झालेच आहे पण त्याने अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधले आहे. त्यामुळे दर चढेच राहणार यामध्ये शंका नाही. या सणानंतर मात्र दर कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे.
आंब्याची आवक अन् दर वाढले
आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आंबा उत्पादकांना बसलेला आहे. केवळ उत्पादनावरच परिणाम नाहीतर बाजारपेठही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे यंदा आंबा फळपिकातून केवळ नुकसानच अशी अवस्था झाली होती. पण कोकणातील हापूस आंब्याने अनेक संकटाची मालिका सर करीत अखेर बाजारपेठ गाठली आहे. अक्षय तृतीयेला आंब्याची मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये आवक तर वाढली आहेच त्याबरोबर दरही वाढले आहेत. हापूसची पेटी 800 ते 2 हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे.
कोकण हापूसचा मार्केटमध्ये दबदबा
आंबा उत्पादक संघाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अखेर मे मध्ये का होईना आंब्याची आवक वाढली आहे. यामध्ये बाजी मारली आहे ती कोकण विभागाने. कारण मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील हापूस आंबा दाखल झाला आहे. सध्या विक्रमी दर असतानाही खरेदी वाढलेली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे दर नसल्याने अक्षय तृतीयेनंतर दर कमी झाल्यावरच हापूस मनसोक्त चाखता येणार आहे.
.