महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. एप्रिलमध्येही अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या वर आहे. मात्र तरीही एप्रिल अखेरीसही राज्यात उष्माघाताचा रुग्ण किंवा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. मागील पाच वर्षांची माहिती घेतली असता उष्माघाताने सर्वाधिक मृत्यू २०१६ मध्ये झाले आहेत. त्या वर्षी मे महिन्यात सर्वाधिक तापमान ४३.८ असे नोंदवले गेले. त्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात पाऱ्याने ४० अंशांचा आकडा गाठला होता. तरीही सुदैवाने एकाही व्यक्तीला उष्माघातामुळे जीव गमावण्याची वेळ आली नाही. गेल्या दोन वर्षांत उष्माघाताने एकाचाही बळी नाही हे विशेष.
सार्वजनिक आरोग्य विभागात उष्माघाताच्या रुग्णांची नोंद केली जाते. सध्या राज्यातील १७ शहरांचा पारा ४० अंशांच्या वर आहे. मार्च २०२२ मध्ये २९१ उष्माघात संशयितांची नोंद झाली आहे. तर २१ जणांचा मृत्यूही उष्माघात संशयित म्हणून नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यात उष्माघात झाल्यावर असतात तशीच लक्षणे असली तरीही हे मृत्यू उष्माघाताने झालेले नाहीत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
काय आहेत उष्माघाताची लक्षणे ?
लूज मोशन्स, उलट्या, शरीरातील पाणी कमी होणे आणि भयंकर ताप अशी लक्षणे दिसून येतात. मात्र, उष्माघात झालेल्या रुग्णाच्या शरीरातील पाणी अतिप्रमाणात कमी होते. याशिवाय रुग्णाचे अवयव निकामी होतात. रक्ताची तपासणी केल्यानंतरच उष्माघात झाल्याची खात्री होते.