मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना महिला पोलिस कर्मचारी जखमी, तात्काळ कारवाईचे निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.४ मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भेटल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना गाडी कडे नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी संदीप देशपांडे यांनी अचानक आपल्या गाडी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर अचानकपणे गाडी निघाली. त्यामुळे पोलिसांना आणि माध्यमांना काही कळण्याच्या आत संदीप देशपांडे पळ काढण्यात यशस्वी ठरले. मात्र, या सर्व झटापटीमध्ये एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे दिसून आले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 4 मेचा अल्टीमेटम दिला होता. आ अल्टीमेटम आज संपत आहे. त्यानुसार राज्यभर महाआरती करण्यात येणार होती. मात्र, अनेक ठिकाणी सकाळची अजान भोंग्यांवर न झाल्याने हे आंदोलन होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत होती.

राज्यात काही ठिकाणी आरती करण्यात आली मात्र त्यानंतर लगेच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. याची माहिती देण्यासाठी संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर माध्यमांशी संवाद साधत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि सदरचा प्रकार घडला.

राज्य सरकारचे कारवाईचे निर्देश
संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असल्याची कल्पना देण्यात आली होती का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी तिथून पळ काढला आणि त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाल्या, या प्रकरणाची वेगळी नोंद घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. या संदर्भात गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

गुन्हा दाखल होणार

संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. त्यामुळे एक महिला कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणात त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *