पिंपरी-चिंचवड मधील उद्योजक अघोषित भारनियमनामुळे त्रस्त ; मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । अघोषित भारनियमनामुळे वीजग्राहक त्रस्त असल्याची तक्रार फेडरेशन ऑफ असोसिएशनने केली आहे. उद्योगक्षेत्राला अखंडीत वीजपुरवठा व्हावा, ही मागणी शासनाचे अधिकारी तथा मंत्री पूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, तसे न झाल्यास उद्योजकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

गेल्या महिन्यापासून पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यात अनियमित वीजपुरवठा होत आहे. लादण्यात आलेल्या या अघोषित भारनियमनामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच घरगुती व्यावसायिक, सूक्ष्म व लघुउद्योग वीजग्राहक मेटाकुटीला आले आहेत. विद्युतनिर्मिती आणि वितरण यातील तूट जास्त आहे. कोळसा उपलब्ध नसणे हे जसे तुटीचे कारण आहे. त्याचप्रमाणे, वीज चोरी व वीज गळती ही देखील कारणे आहेत. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू झाल्यास ही समस्या सुटू शकेल. मात्र, कारणे शोधणे व उपाययोजना करणे हा विषय वीजमंडळाचा आहे. शासनाने योग्य वेळी दखल घेणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही.

अखंडीत वीजपुरवठा नसल्यास जनरेटरचा वापर करावा लागतो. डिझेलचे वाढते दर पाहता ते परवडत नाही, याकडे संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

“अनियमित वीजपुरवठ्यामुळे वीजग्राहक त्रस्त आहेत. शासनाने योग्य दखल घेऊन उपाययोजना करावी. उद्योगधंदे हा देशाच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे उद्योगांना अखंड वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास उद्योजकांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.” असं फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *