महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । खडकवासला प्रकल्पातील (Khadakwasla Project) चार धरणांमध्ये (Dam) आजअखेर ९.९१ अब्ज फूट (टीएमसी) पाणीसाठा (Water Storage) आहे. या प्रकल्पामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पाणीसाठ्यात सुमारे दोन टीएमसीने घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे.
पुणे शहराची पाण्याची गरज सुमारे दीड टीएमसी इतकी आहे. परंतु उपनगरांमध्ये नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे महापालिकेला त्यापेक्षा अधिक पाणी घ्यावे लागत आहे. उच्च न्यायालयाने समाविष्ट २३ उपनगरांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरालगतच्या अन्य उपनगरांमध्येही खासगी टॅंकरने पाणी घेतले जात आहे.
उन्हाळी हंगामासाठी आवर्तन
खडकवासला धरणातून दौंड नगरपालिका आणि ग्रामीण भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन दिले जाते. सध्या उन्हाळी पिकांसाठी पहिलेच आवर्तन सुरू आहे. त्यासाठी उजवा मुठा कालव्यातून प्रतिदिन ११४८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच, ‘जलसंपदा’कडून दुसरे आवर्तन देण्याचेही नियोजन आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारीनुसार दुसऱ्या आवर्तनामध्ये तीन ते साडेपाच टीएमसीपर्यंत पाणी सोडण्यात आले आहे.