महाराष्ट्र २४- ऑनलाईन -पुणे ; शहरातील मार्केटयार्ड उद्या शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशन तसेच कामगार युनियन, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटना यांनी घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड व त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील केला असून कर्फ्यु सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही़ तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवार १० एप्रिल २०२० पासून फळे, भाजीपाला, कांदा -बटाटा व केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आडते असोसिएशनला पत्राद्वारे कळविले असल्याचे आडते असोसिएशनने म्हटले आहे.