महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात वाढत चाललेल्या करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येबदल चिंता व्यक्त केली. आता आणखी वाढ व्हायला नको. त्यामुळे घरातून बाहेर पडू नका. बाहेर पडण्याची वेळ आली, तर मास्कशिवाय फिरू नका, असं आवाहन ठाकरे यांनी केलं. यावेळी त्यांनी केंद्राकडून करण्यात आलेल्या रेशन वाटपाबद्दलही खुलासा केला.
यावेळी शिधा वाटपाच्या मुद्यावरही मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मला असं कुणीतरी विचारलं की, केंद्र सरकारनं धान्य दिलं तर तुम्ही वाटत का नाही? तर केंद्र सरकार आपल्याला देत आहे. केंद्र सरकारचं उत्तम सहकार्य आहे. पण केंद्रानं जी योजना दिली आहे. त्यात फक्त तांदूळ आहे. ज्याच वाटप दोन तीन दिवसांपासून सुरू झालं आहे. ही योजना अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच आहे. केशरी कार्ड धारकांसाठी नाही. मी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांना फोन करून विनंती केली आहे. हे सगळं करत असताना शहरी भागात मासिक ५० हजार ते १ लाख आणि ग्रामीण भागात ४० हजार ते एक लाख उत्पन्न असणाऱ्या मध्यम वर्गीयांसाठी वेगळी योजना केली पाहिजे. किमान आधारभूत किंमतीवर राज्य सरकारला धान्य दिलं, तरी चालेल, अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. यासंदर्भात पत्रही देण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.