मनसैनिकांनी शहाणपणा करू नये, राज ठाकरेंच्या कडक सूचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला विराट सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. विविध नेते मंडळींकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली आहे. तर मनसेच्या काही नेते मंडळींसह पदाधिकाऱ्यांकडूनही अयोध्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ८) राज ठाकरे यांनी कडक शब्दांत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.”
तसेच “इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!” असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना दिली आहे.

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्द्यावरून राज्यसह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदाच्या गुढीपाडव्यापासून त्यांनी राज्यात तीन सभा घेतल्या. यात त्यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज यांच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. तसेच या दौऱ्यासाठी मनसेकडून रेल्वेचे बुकिंग देखील करण्यात आले असून राज्यभरातील मनसैनिक राज ठाकरेंसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *