महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । उष्णतेच्या लाटांमुळे ग्रीष्माची दाहकता कमी होण्याचे नाव घेत नाही. संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाला असताना हवामान विभागाने आणखी तापदायक बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील विदर्भासह काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने शनिवारी दिला. विदर्भातील 7 जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात रविवारी सकाळी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान बेटाजवळ कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती शुक्रवारी झाली. शनिवारी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले.
आता रविवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्ट्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. हे वादळ सध्या पोर्ट ब्लेअरपासून 300 कि.मी., आंध्र प्रदेशपासून 1,270 कि.मी., तर ओडिशा किनारपट्टीपासून 1,300 कि.मी. अंतरावर घोंघावत आहे. अवघ्या 48 तासांत ते आंध्र व ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे या भागात 115 ते 204 मि.मी. पावसाचा अंदाज आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांसह सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र 11 मेपर्यंत उष्णतेची लाट राहील. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.