महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन -पुणे : राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळले आहेत. याच दोन्ही महापालिका आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. पण कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेतली, तर कोरोनाचं सर्वात उग्र रूप सध्या पुण्यात दिसत आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर खूपच जास्त आहे. 9 एप्रिलला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत 181 कोरोनारुग्ण सापडले आहेत आणि या शहरात 24 बळी गेले आहेत. याचा अर्थ पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर 13 टक्क्यांच्या पुढे आहे. कोरोनाचं सर्वात भीषण रूप पाहिलेल्या इटलीहूनही हा मृत्यूदर जास्त आहे.
जगभरात इटलीने आतापर्यंत कोरोनाव्हायरसचं सर्वाधिक भयंकर रूप पाहिलं आहे. चीनमध्ये सुरू झालेली ही साथ त्या देशात मात्र 3 टक्के मृत्युदरापर्यंत रोखता आली. इटलीत कोरोनाचा मृत्यूदर 12 टक्के आहे. स्पेनमध्ये हा दर 10 टक्के आहे. म्हणजे प्रत्येक 100 कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 10 जणांचा मृत्यू होत आहे.
फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये ही संख्या 10 टक्क्यांच्या जवळ जात आहे. इटलीतल्या लोम्बार्डी शहरात या विषाणूनं थैमान घातलं आहे. तिथला मृत्यूदर 18 टक्क्यांच्या आसपास आहे. न्यूयॉर्कमध्येही मृत्यूदर वाढत असून तो 5 टक्क्यांच्या आसपास आहे.