महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० मे । यंदा राज्यात मार्च महिन्यापासूनच विक्रमी तापमानाची नोंद झाली. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे. राज्यात दरवर्षी एक मार्च ते ३१ जुलै या काळात उष्णताविषयक विकारांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार ६ मे २०२२ पर्यंत एकूण ४६७ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर जिल्हा मृत्यू अन्वेषण समितीने एकूण १७ मृत्यू निश्चित केले आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये उष्माघात मृत्यू अन्वेषण समिती नेमण्यात आली आहे. या समितीने रुग्णांची लक्षणे, रुग्णाला होणारे इतर आजार, रुग्णाने उन्हामध्ये काम करण्यासंदर्भातील माहिती आणि संबंधित ठिकाणचे तापमान, आर्द्रता या बाबी लक्षात घेऊन हे मृत्यू नोंदवले आहेत. त्यासह उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात उष्णतेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी ‘हिट ॲक्शन प्लान’ अर्थात उष्मा प्रतिबंधक कृतियोजना आखली आहे.
राज्य तसेच जिल्हास्तरावर उष्णतेचे विविध विकार आणि त्यावरील उपचार याबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सर्व जिल्ह्यांना या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
या व्यक्तींना अधिक धोका
उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक
वृद्ध आणि लहान मुले
स्थूल, पुरेशी झोप न झालेले लोक
गरोदर महिला
अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले रुग्ण, अपस्मार रुग्ण, दारूचे व्यसन असलेले नागरिक
मंडळनिहाय निश्चित मृत्यू
औरंगाबाद २
लातूर १
नाशिक ४
अकोला १
नागपूर ९