महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन -मुंबई : : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल कोरोनामुळे रद्द होण्याच्या मार्गावर असताना चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 29 मार्चला सुरू होणारी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा जुलैमध्ये आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वतीने लॉकडाऊननंतर याबाबत बैठक घेणार आहे.
सीएनबीसी टीव्ही-18ला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै अखेरीस रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन केले जाऊ शकते. यासाठी बीसीसीआयच्या वतीने तारखा शोधण्याचे काम सुरू आहे. यानुसार जुलै किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो. दरम्यान, जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बीसीसीआयला 7 हजार कोटी ते 47 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.