युवराज संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी तुळजापूर शहर कडकडीत बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ मे । सलमान मुल्ला । याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे हे तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले असता महाराजांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून प्रतिबंध केला गेला.

तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते.युवराज संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले.

मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो.

भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते.मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे.

पूर्वी हा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा भवानी माता छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने देखील कधीही इथे हस्तक्षेप केला नाही.ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम लादले नाहीत.

छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.

युवराज संभाजीराजे देखील भवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात, तेव्हा ते परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात. यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता, त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते.

मात्र, काल ते दर्शनास आले असता महाराजांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून प्रतिबंध केला गेला.

यावेळी जिल्हाधिकारी दिवेगवकर व तुळजापूरचे तहसीलदार यांनी सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरात जाण्यापासून रोखले.

महाराजांनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी नम्र विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही. गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, ही परंपरा आहे.

निजामाने आणि इंग्रजानी देखील या परंपरा मध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही त्या परंपरा हे सरकार मोडू पाहत आहे.

देवीच्या दारात वाद नकोत म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी जरी शांततेने हे प्रकरण हाताळले असले तरी सरकारने समस्त महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचा हा अपमान केला आहे.

सरकारने आणि प्रशासनाने समस्त महाराष्ट्र वासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल माफी मागावी आणि हा प्रकार पुन्हा घडू नये याची हमी द्यावी.अशी मागणी होत होती..

याच घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली होती याचा तुळजापूर बंदला तुळजापूर वासियांनी प्रतिसाद देत तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांनी पुजारी व्यापारी प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी सकल मराठा समाज तर्फे करण्यात आली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *