मान्सून तीन दिवसांत अंदमानमध्ये, एक आठवडा आधीच आगमनाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । प्रचंड उष्म्यामुळे पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या देशवासीयांसाठीची शुभवार्ता गुरुवारी हवामान विभागाने प्रसिद्ध केली. असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असतानाच पुढील तीन दिवसांत, म्हणजेच १५ मेच्या दरम्यान दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केला.

अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख २२ मे आहे. त्या तुलनेत एक आठवडा आधीच यंदाच्या मान्सूनचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला असून, आग्नेय बंगालच्या उपसागरावर ढगांची गर्दीही दिसून येत आहे. पुढील पाच दिवसांत अंदमान-निकोबार बेटांवर सर्वदूर पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तारित हवामान अंदाजानुसार मान्सूनची त्यापुढील प्रगतीही वेगाने होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार १३ ते १९ मे दरम्यानच्या आठवड्यात केरळ किनारपट्टीवर; तर २० ते २६ मे या आठवड्यात महाराष्ट्रापर्यंतच्या किनारपट्टीवर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या तारखेचा हवामान विभागाचा अधिकृत अंदाज १४ किंवा १५ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, १४ ते १६ मे दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यताही विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *