महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उत्तरार्ध सुरू असल्याने आता प्रत्येक लढतीनंतर प्ले ऑफच्या शर्यतीतील समीकरण बदलत जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये उद्या, 13 मे रोजी प्ले ऑफच्या रेसमधील महत्त्वाचा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. बंगळुरू हा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. दुसरीकडे पंजाबलाही प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे.
पंजाब किंग्जच्या खात्यात 10 गुण असून त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित तीनही साखळी लढती जिंकाव्या लागणार आहेत. पहिल्या साखळी लढतीत पंजाबने राजस्थानला हरवले होते, मात्र त्यांचा स्पर्धेतील प्रवास हा चढउताराचा राहिलेला आहे. अनुभवी शिखर धवन, भानुष्का राजपक्षे चांगल्या फॉर्मात आहेत. लियाम लिविंगस्टोन व जितेश शर्मा फिनिशरची भूमिका चोखपणे बजावत आहेत. जॉनी बेअरस्टॉ फॉर्ममध्ये आल्याने पंजाबला मोठा दिलासा मिळाला आहे.