महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे सध्या ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. केतळीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज तिची पोलिस कोठडी संपणार आहे. गेल्या सुनावणीत केतळीने स्वत: न्यायालयात युक्तिवाद केला होता. केतकीला न्यायालयात हजर केल्यानंतर तिने केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र न्यायालयाने केतकीला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केतळीने फेसबुकवर शेअर केली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याप्रकरणी केतळीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे कारण याप्रकरणाचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून तिला अटक करण्यात आली आहे. सध्या ती तुरुंगात असून तिची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज न्यायालय केतकीला दिलासा देणार की, पुन्हा केतकीच्या अडचणीत वाढ होणार हे पाहावे लागणार आहे. कारण, केतळीवर राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
मी पोस्ट डिलीट करणार नाही
गेल्या सुनावणीत केतकीने युक्तीवाद करण्यासाठी वकीलाची मदत घेतली नव्हती. तिने स्वत: कोर्टात युक्तीवाद केला होता. “ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का?” असा सवाल देखील तिने केला होता. केतकीने सांगितलं की, मी ही पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असे देखील तिने कोर्टासमोर म्हटले होते.
केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल?
अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलिस ठाण्यात देखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.