IPL प्लेऑफसाठी चुरस वाढली ; चौथ्या जागेसाठी ३ संघांचा दावा

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मे । सनरायझर्स हैदराबादने पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ३ धावांनी पराभव करून आयपीएल २०२२ प्लेऑफ (IPL 2022 Playoffs)मध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहे. या विजयामुळे हैदराबादला आयपीएल २०२२ पॉइंट्स टेबलमध्ये फारसा फायदा झाला नाही, परंतु संघाच्या खात्यात १२ गुण झाले आहेत.

१५ व्या मोसमातील ६५ सामन्यांनंतर अद्याप गुजरात टायटन्स या नव्या संघाने आयपीएल २०२२ प्ले ऑफचे तिकीट मिळवले आहे. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे यांचे सामान १६ गुण असून ते प्लेऑफ जागेपासून फक्त एक विजय दूर आहे. लखनौला त्यांचा पुढील सामना आज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायचा आहे आणि तो जिंकल्यानंतर ते प्ले ऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनेल. तसेच राजस्थान देखील प्ले ऑफच्या उंबरठयावर आहे.

तथापि मनोरंजक म्हणजे आता प्ले ऑफच्या चौथ्या जागेसाठी तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि केकेआर यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि बेंगळुरूचे गुण समान आहेत. पण पंजाब किंग्सविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीचा नेट रन रेट +०.२५५ झाला आहे तर बंगळुरूचा -०.३२३, त्यामुळे दिल्लीकडे प्ले ऑफ गाठण्यासाठी मोठी संधी आहे.

दिल्ली मुंबई इंडियन्सविरुद्धचा त्यांचा अंतिम सामना जिंकला आणि बेंगळुरू व केकेआर पराभूत झाल्यास दिल्लीला प्ले ऑफचे तिकीट मिळेल. तर कोलकाता १३ सामन्यांतून १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि जर संघाने लखनऊविरुद्ध सामना मोठ्या फरकाने जिंकला, तर त्यांना प्ले ऑफसाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागेल. केकेआरच्या बाजूने जाणारी गोष्ट म्हणजे त्यांचा सकारात्मक नेट रनरेट. तथापि आज लखनऊविरुद्ध पराभूत झाल्यास कोलकात्याला आपली बॅग बांधून घरी जावे लागेल.

याशिवाय दोन वेळा आयपीएलचे उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची प्ले ऑफची वाट बिकट आहे. फाफ डु प्लेसिसच्या आरसीबी संघाला आपला अंतिम लीग सामना फक्त जिंकणेंच नाही तर मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. बेंगळुरूचा नेट रनरेट नकारात्मक आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे दिल्ली आणि कोलकाताला प्ले ऑफ खेळण्याची संधी आहे.

तसेच दिल्ली आणि केकेआरच्या सामन्यांचे निकाल देखील बंगळुरूसाठी महत्वपूर्ण असेल. दिल्लीने अंतिम लीग सामना जिंकल्यास आरसीबीचा खेळ खल्लास होईल. अशा परिस्थितीत आता आयपीएल प्ले ऑफच्या चौथ्या क्रमांकावर कोणता संघ विराजमान होईल हे पाहणे मनोरंजक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *