![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ मे । र्नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती सुरू असताना महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसतो आहे. शुक्रवारी (२० मे) पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत फळबागांचे नुकसान झाले. शनिवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी पावसाची घोडदौड सुरूच असून, दक्षिणेच्या बाजूने प्रगती करीत हा पाऊस आता अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे.
मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरू असतानाच देशाच्या विविध भागांमध्ये सध्या पाऊस होतो आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे. महाराष्ट्रातही या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पूर्वमोसमी पावसाची हजेरी आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावतो आहे.
राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ६ मे रोजी अंदमानात दाखल झाल्यानंतर दक्षिणेच्या बाजूने मोसमी पावसाची प्रगती झाली नव्हती. शुक्रवारी या भागातून मोठी प्रगती करीत मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाला.
सांगलीत दमदार..
मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला पूर्वमोसमी पावसाचा प्रामुख्याने तडाखा बसला आहे. काही भागांत फळबागांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी ओढय़ा-नाल्यांना पूर येऊन पाणी शेतात शिरले. सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात ओढय़ांना पूर आले आहेत.
पाऊसभान..
बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस होतो आहे. शुक्रवारी सांगली, कोल्हापूर, पंढरपूर भागात मोठय़ा पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी, लातूर आदी भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. विदर्भात यवतमाळसह काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस, तर तुरळक ठिकाणी गारपीटही झाली.
पिकांचे नुकसान..
पंढरपुरात पावसासह सोसाटय़ाच्या वाऱ्याने केळीच्या बागा, द्राक्ष, डाळिंब, शेवगा यांसारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोलापूर शहरासह उत्तर आणि दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, सांगोला आदी भागांत पावसाचा जोर होता.
बहुतांश ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. शेतांमध्ये पाणी शिरले.