Cement Price Hike : आता घर बांधणे महागणार; ‘या’ कंपनीकडून सिमेंटच्या दरात वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मे । घर बांधणे अथवा खरेदी करणे आणखी महागणार आहे. देशातील प्रमुख सिमेंट कंपनी इंडिया सिमेंटने आपल्या सिमेंटच्या दरात प्रति गोणी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति गोणी 55 रुपयांची दरवाढ करण्यात येणार आहे. मात्र, ही दरवाढ टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले.

इंडिया सिमेंट कंपनी जून ते जुलै दरम्यान तीन टप्प्यांमध्ये दरवाढ करणार आहे. एक जून रोजी प्रति गोणी 20 रुपये, त्यानंतर 15 जून रोजी 15 रुपये आणि एक जुलै रोजी 20 रुपयांची दरवाढ करण्यात येणार आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी सांगितले की, कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन भांडवल उभारण्यासाठी काही जमीव विकणार आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आमच्याकडे जवळपास 26 हजार एकर जमीन आहे. या जमिनी वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत.

इतर कंपन्यांकडून दर कपात केली जात असताना तुम्ही सिमेंटचा दर का वाढवत आहात, असा प्रश्न श्रीनिवासन यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. आम्ही दरवाढ न केल्यास आम्हाला मोठा तोटा होईल असे श्रीनिवासन यांनी म्हटले.

इंडिया सिमेंटचे आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये एकूण उत्पन्न 4,729.83 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये तिचे एकूण उत्पन्न 4,460.12 कोटी रुपये होते. मात्र, या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा झपाट्याने घसरून रु. 38.98 कोटी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *