महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मे । Ford कंपनीने विक्री मोठ्या प्रमाणात मंदावल्यामुळे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा धक्का ग्राहकांसह ऑटोमोबाइल सेक्टरलाही बसला. यानंतर फोर्ड कंपनीच्या भारतातील प्लांटचे अधिग्रहण करण्यासाठी काही कंपन्यांमध्ये चुरस होती.
Ford कंपनीचा साणंद गुजरात येथील प्लांटची मालकी आता TATA कडे असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्लांटचे अधिग्रहण करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक होत्या. पण रतन टाटांच्या ग्रुपने बाजी मारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक सुधारणा आणि गरजेनुसार बदल करून टाटा मोटर्स या प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार आहे. टाटा मोटर्सला गुजरात सरकारकडून मंजुरी मिळाली असून, त्यात फोर्ड इंडियाचा साणंद उत्पादन प्रकल्प ताब्यात घेणार असल्याचे समोर आले आहे.टाटा मोटर्सला प्लांटचे उद्घाटन होताच गुजरात सरकारने फोर्डला यापूर्वी प्रदान केलेले सर्व प्रोत्साहन आणि फायदे मिळणे सुरू होईल. प्लांट खरेदीबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे. यामध्ये कराराचा आकार, कामगार संबंधित समस्या, आर्थिक स्थिती आणि इतर समस्यांचा समावेश आहे.
दोन्ही कंपन्यांमधील नाते तसे फार जुने आहे. ही गोष्टही तितकी साधी नाही. रतन टाटा यांनी भारताची पहिली संपूर्ण स्वदेशी कार टाटा इंडिका लाँच केली. परंतु याला अपेक्षित यश मिळाले नाही.सन १९९९ मध्ये टाटांनी आपल्या कार व्यवसायाची विक्री करण्यासाठी फोर्डशी संपर्क केला. परंतु त्यावेळी फोर्डचे प्रमुख असलेल्या बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना कारच्या बाबतीत काही माहितीच नाही, तर कारचे उत्पादन का सुरू केले असे म्हटले.
टाटांचा कार व्यवसाय खरेदी करून फोर्ड उपकार करत आहे, असेही त्यांनी म्हटले होते. सन २००८ मध्ये जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला.
यावेळी फोर्ड ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. त्याचवेळी रतन टाटा यांनी फोर्डला मदतीचा हात पुढे करून Jaguar Land Rover हा ब्रँड खरेदी केला.रतन टाटांनी केवळ हा ब्रँड खरेदीच केला नाही, तर तो यशस्वीही करून दाखवला. आताच्या घडीला भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक क्षेत्रात टाटाचाच बोलबाला अधिक आहे.