‘डेक्कन क्वीन’चा 93वा वाढदिवस : पुणे रेल्वे स्टेशनवर बँड पथकाच्या जल्लोषात स्वागत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजलेली डेक्कन क्वीन आज सकाळी पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दाखल होताच तिचे बँड पथकाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनवर केक कापून तिचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

डेक्कन क्वीन रेल्वेने 92 वर्ष पूर्ण करून 93 व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही रेल्वे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची जवळची रेल्वे मानली जाते आहे. सकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आणि सायंकाळी मुंबईहून पुण्याला येण्यासाठी रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या डेक्कन क्वीनचा वाढदिवस बुधवारी सकाळी 6.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने मोठ्या थाटामाटात करण्यात आला.यावेळी विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे, तमिळ चित्रपटातील अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष हर्षा शहा अन्य रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी,आरपीएफ, रेल्वे पोलिस व प्रवासी उपस्थित होते.

यावेळी स्टेशन मास्तर कार्यालयाजवळ केक कापण्यात आला. केक कापल्यानंतर इंजिन पूजन करून चालकाचा सत्कार करण्यात आला. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.

67 वर्षांपासून वाढदिवस साजरा

दि ग्रेट इंडीया पॅनासुलर रेल्वे (जीआयटीआर) यांनी दिनांक 1 जून 1930 रोजी ‘पुणे-मुंबई-पुणे’ या मार्गावर ईलेक्ट्रिक, हायस्पीड, कंफर्ट, लक्झरी, डिलक्स सुविधांनी परिपुर्ण अशी ‘डेक्कन क्वीन’ ही रेल्वे गाडी सुरू केली. ती आता मध्य रेल्वे अंतर्गत सुरू आहे. ही जगातील एकमेव ट्रेन आहे, जिचा वाढदिवस साजरा होत असतो. गेल्या 67 वर्षांपासून म्हणजेच रेल्वे सेवा सुरू होऊन अगदी पाच वर्षे झाल्यापासून वाढदिवस साजरा केला जातो, असे रेल्वे अधिकारी हर्षा शहा यांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *