“निर्बंध नको आहेत तर मास्क वापरा”; मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी नागरिकांना केले आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आज कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत. (CM Uddhav Thackeray On Maharashtra Corona)

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जर का नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीमध्ये डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोरोना संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोरोना आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. तसेच कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट 6 टक्के असून राज्याच्या रेटमध्ये वाढ झाली असून तो 3 टक्के झाल्याचे व्यास यांनी यावेळी सांगितले. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या आणि ते व्यवस्थित आहेत हे पाहण्याचेही निर्देश दिले आहेत. याशिवाय या रूग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून तेवाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.

वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांच्यासह कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने व्हर्चुअली उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *