महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । महाराष्ट्रासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लवकरच महाराष्ट्राला पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन मिळणार आहे. याद्वारे आपल्याला मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त २ तास ३० मिनटांत करता येणार आहे. १५ ऑगस्ट पर्यंत २ गाड्या महाराष्ट्राला मिळू शकतात.
१५ ऑगस्ट पर्यंत वंदे भारत ट्रेन मुंबई पुणे यादरम्यान धावणार असल्याची माहिती दिली आहे. आत्ता उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई ते पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास अडीच तासावर येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतात दोन महत्त्वाच्या शहारातील प्रवास वेगवान व्हावा यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येतात. येत्या दोन वर्षात तब्बल ४०० वंदे भारत ट्रेन संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये वाराणसी – नवी दिल्ली, वैष्णोदेवी – नवी दिल्ली या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. त्यामध्ये आता महाराष्ट्रातील मुंबई – पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन येण्याची शक्यता आहे.
परंतु मुंबई पुणे मार्गासाठी वंदे भारत ट्रेनसाठी रेल्वे बोर्डाकडून परवानगी देण्यात आलेली नाही पण १५ ऑगस्ट पर्यंत दोन गाड्या सुरू होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वंदे भारतच्या गाड्या पूर्णपणे वातानुकुलित असल्यामुळे प्रवास जास्त आरामदायी होणार आहे.