वाढत्या तापमानाचा पुणेकरांवर असा होतोय इफेक्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जून । पुण्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाला केवळ हवामानातील बदल कारणीभूत नसून, शहरातील ‘उष्णतेची बेटं’ (हिट आयलंड) जबाबदार ठरत आहेत. वाढत्या काँक्रिटीकरणाचा परिणाम शहरातील तापमानावर झाला असून, उपनगरांमधील तापमानात चार ते पाच अंशांपर्यंत जास्त आकडे दिसत आहेत.

हडपसर, नगर रस्ता, खराडी, बाणेर अगदी कोथरूडमधील काही भागांतही ते अधिक नोंदवले जात आहे. भौगोलिक रचनेनुसार अनेक ठिकाणी ‘उष्णतेची नैसर्गिक बेटे’ आहेत. प्रामुख्याने खडकाळ प्रदेश, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात ही बेटे बघायला मिळतात. अलीकडे अनेक शहरांत वेगाने होत असलेल्या दाट बांधकामांमुळे मानवनिर्मित उष्णतेची बेटे म्हणजे ‘अर्बन हिट आयलंड’ तयार होत आहेत. याचा मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होत असून, डोकेदुखी, थकवा आणि उष्माघाताच्या तक्रारी या भागात जास्त असतात.

पुणे शहर यात मागे नसून, गेल्या २० उपनगरांमध्ये वेगाने वाढलेले काँक्रिटचे जंगल आणि काचेच्या इमारतींचे जाळे विस्तारले आहे. या इमारती सूर्याची उष्णता शोषून घेतात. वातानुकूलित यंत्रणेच्या अतिवापरामुळेही हरित वायूंचे उत्सर्जन जास्त होते. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे मार्गही प्रशासनाने बंद केले आहेत. परिणामी, या भागांमध्ये हवेतील उष्णता वाढली आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नोंदविण्यात येणाऱ्या रोजच्या तापमानातही तापमानातील फरक प्रकर्षाने दिसतो आहे.

शहरात सरासरी नोंदवल्या जाणाऱ्या तापमानाच्या तुलनेत काही ठरावीक भागात तापमानाची नोंद जास्त होते. प्रामुख्याने ओसाड जमीन, खडकाळ प्रदेश असलेल्या ठिकाणी अशी नैसर्गिक उष्णतेची बेटे असतात; पण शहरात सध्या तयार होत असलेली ‘उष्णतेची बेटे’ ही मानवनिर्मित कारणांमुळे होतात. काँक्रिटच्या इमारतींची दाट वस्ती, जास्त लोकसंख्या वातानुकूलित यंत्रणेचा अतिवापर, काचेच्या इमारती असलेल्या भागांत अशी उष्णतेची बेटे तयार होतात. या भागातील सूर्याची उष्णता पुन्हा उत्सर्जित केली जाते. तापमान इतर भागांपेक्षा जास्त नोंदवले जाते. पुण्यात फिरताना आणि हद्द ओलांडून बाहेर पडल्यावर लगेच तापमान कमी झाल्याचे अलीकडे प्रकर्षाने जाणवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *