राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांचा मुहूर्त निश्चित ?, जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मुहूर्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक वेगळी बातमी मिळत आहे. मागील कित्येक दिवसांपासून राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांचा मुहूर्त निश्चित झाला असून या निवडणुका येत्या जुलै ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नेत्यांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार असून राजकीय वातावरण तापणार आहे. (Municipal Corporation Election in Maharashtra 2022)

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं संकेत दिले असून 31 मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणावरून सुनावणी केली होती. यामध्ये राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळून 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यामुळे लवकरच 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत पार पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यास राज्यात मिनी विधानसभा निवडणुका रंगणार आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. नऊ महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगानं (SEC) पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत संकेत दिले आहेत.

राज्यातील 14 महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आदी महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यातील काही जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *