गोवा मुख्यमंत्र्यांचे बेकायदा पार्लरवर कारवाईचे आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । चंदगड प्रकरणी झालेल्या नाचक्कीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सायंकाळी उशिरा आपला सुरक्षा ताफा बाजूला ठेवत मोटर सायकल पायलट सोबत कळंगुट परिसरात चक्कर मारून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

गोव्यात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सर्व मसाज पार्लर, नाईट क्लब आणि डान्सबारवर आज सोमवारपासून कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. चंदगड येथील पर्यटकांना मारहाण व लूट तसेच वाढते गुन्हे लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी कळंगुट किनारी जाऊन आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसह दृष्टीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद केला. त्यांनी पायलट बाईकवरून परिसराची पाहणीही केली. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, निरीक्षक लक्षी आमोणकर हे उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसाय तसेच काम करणाऱ्या सर्वांची पोलिसांकडून पडताळणी केली जाईल. राज्यात केवळ कायदेशीर स्पा-मसाज पार्लर यांनाच मान्यता आहे. त्याव्यतिरिक्त बेकायदा मसाज पार्लर खपवून घेतले जाणार नाही.

अवैधपणे सुरू असलेले नाईट क्लब, डान्सबार यांच्यावर सोमवारपासून कडक कारवाई केली जाणार आहे. आदेशाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे..

कळंगुट, हणजुणे, पेडणे यासारख्या किनारी भागांना अतिरिक्त पोलीस स्थानक देण्याची सरकारची तयारी आहे. तसेच किनारी व वाहतूकीसाठी अतिरिक्त पोलिस बळ देण्यास सरकार विचाराधीन आहे. जेणेकरून गोवा हे सुरक्षित पर्यटनस्थळ असल्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला जाईल. शिवाय पुढील हंगामापासून किनाऱ्यांवरील फेरीवाल्यांना हटविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *