राज्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ जिल्ह्यांना झोडपलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । महाराष्ट्रात सध्या सगळ्यांनाच मान्सूनची प्रतिक्षा आहे. पण हवामानात होणाऱ्या बदलांमुळे पावसाला येण्यास विलंब होत आहे. अशात मात्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातल्या अनेक जिल्ह्यांसह नवी मुंबईतही पावसाच्या सरी बरसल्या. या मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा थोडा का होई ना सुखावला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात कोकणातील पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. रत्नागिरी-लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह लांजा तालुक्याला पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर भारताची दुसरी चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग आंबोलीत मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस झाला.

 

मृग नक्षत्राच्या पूर्व संध्येला पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल एक तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. कर्नाटक आणि गोवा इथं मान्सून रेंगाळत असतानाच सायंकाळी आबोलीत पावसाने जोरदार हजेरी लावली. सिंधुदूर्गमध्ये ढगाळ आणि दमट पावसाळी वातावरण असून काही भागात पुढील ३ ते ४ तासांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रत्नागिरी भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ०८ जून २०२२ ते १० जून २०२२ या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्राच्या ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तरी मच्छीमारांनी संबधित कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जावू नये असा इशारा देण्यात आला असल्याचं जिल्हा प्रशासनाने कळविलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *