राज्यसभा निवडणूक :तुरुंग, कोविड, गंभीर आजारामुळे 5 मतांची अनिश्चितता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । कोरोना लागण झाल्याने सक्तीचे विलगीकरण, न्यायालयीन कोठडीतील लोकप्रतिनिधींना मतदानास कायद्याची मनाई आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लोकप्रतिनिधी अशा विविध समस्यांनी १० जून रोजी होत असलेल्या राज्यसभेच्या मतदानाला ग्रासले आहे. परिणामी सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाल्याने या निवडणुकीत ५ लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयी बुधवारी (ता.८) रात्रीपर्यंत अनिश्चितता होती.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना १० जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी एअर लिफ्ट करून मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास ४ हजार २०० मते आवश्यक आहेत. पण, सध्या ५०० मतांचे मूल्य असलेल्या ५ लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने दोन्ही बाजूकडे चिंता आहे. शरद पवार यांनी बुधवारी लखनऊ ते विरार अशी फोनाफोनी केली. त्यानंतर समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना फोन करून आघाडीला पाठिंबा देण्याची सूचना केली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची आघाडीच्या शिष्टमंडळाने बुधवारी विरार येथे भेट घेतली. तसेच शरद पवार यांनीदेखील ठाकूर यांना फोन केला. बविआचे विधानसभेत ३ आमदार आहेत.

देशमुख, मलिकांबाबत आज होणार निर्णय
अनिल देशमुख व नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे दोन माजी-आजी मंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर बुधवारी (ता.८) सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी निकाल होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *