आयटीआय ; आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू, वाचा एका क्लिकवर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून ।राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (ता. १७) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर पहिल्या प्रवेशफेरीसाठी विद्यार्थ्यांना २२ जूनपासून व्यवसाय आणि संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करता येतील, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील शासकीय व खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पद्धती राबविण्यात येते. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय व खासगी आयटीआयमध्ये दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित केल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल, असेही राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दि. अं. दळवी यांनी प्रवेश सूचनेच्या पत्रकात नमूद केले आहे.

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी एकच अर्ज भरावा, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या विद्यार्थ्यांचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश दिल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि संबंधित विद्यार्थी संपूर्ण प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील ऑनलाइन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवेशफेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अकाउंटला लॉग-इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवडलेल्या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे गरजेचे आहे, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक :
तपशील : कालावधी
– ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : १७ जूनपासून
– अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे : २२ जूनपासून
– पहिल्या प्रवेशफेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सदर करणे : २२ जूनपासून

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ
– https://admission.dvet.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *