अपक्षांकडे झालेले दुर्लक्ष महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार ? महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । सत्तेत सहभागी झालेल्या आणि पाठिंबा दिलेल्या १६ आमदारांबरोबरच आघाडीतील घटक पक्षाच्या आमदारांकडे अडीच वर्षांत केलेले दुर्लक्षच सध्या महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत दहा आमदारांनी दिलेला धक्का हा त्याचाच पुरावा होता, आता तर विधान परिषद निवडणुकीतही या आमदारांची भूमिका गुलदस्तात असल्याने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. तीन पक्ष एकत्र आल्याने बहुमताचा आकडा सहज पार झाला. तरीही समाजवादी, स्वाभिमानी शेतकरी, शेकाप, प्रहार जनशक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांच्यासह अनेक घटक पक्ष त्यांच्या सोबत गेले. आठ अपक्षांनी आघाडीला पाठिंबा दिला. अडीच वर्षांत या आमदारांकडे प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना कोणत्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही. यामुळे घटक पक्षाचे नेते सतत तक्रार करत होते; पण बहुमतासाठी त्यांच्या मताची फारशी गरज नसल्याने या नेत्यांनी त्यांच्याकडे काणाडोळा केला. त्याचा फटका मात्र राज्यसभा निवडणुकीत बसला. मतदान दाखवून करायचे होते, तरीही दहा अपक्ष आमदार भाजपच्या गळाला लागले.

राज्यसभेपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने एक जादा उमेदवार उभा केला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दहा जागांसाठी अकरा उमेदवार असल्याने एकाचा पराभव अटळ आहे. हा पराभव कोणाचा होणार याचीच उत्सुकता आहे. दहावा उमेदवार हा अपक्ष आणि घटक पक्षाच्या मतावरच निवडून येणार आहे. यामुळेच निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

अडीच वर्षात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले अशी उघड तक्रार अपक्ष आणि घटक पक्षाचे आमदार करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तर नुसती तक्रार केली नाही, तर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. इतरांनी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केली. उघड मतदान असतानाही हे आमदार सत्ताधारी आघाडीबरोबर राहिले नाहीत. यामुळे शिवसेनेच्या विजयाचे गणित बिघडले. या पार्श्वभूमीवर आता विधान परिषद निवडणूक होत आहे. पुन्हा एकदा या अपक्ष आमदारांना भाव आला आहे. आता गुप्त मतदान असल्याने कुणाचे मत फुटले हे कळणार नाही. यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *