महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसणार असल्याची माहिती असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या काही समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून शिवसेनेत खळबळ उडाली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे. राणे यांच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, ते कुठं आहेत याबाबत असं काही सांगावं लागत नाही. त्याला नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न त्यांनी केला.
यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचं राहिलं काय असा प्रश्न करत राज्यात आणि देशात पक्ष संपत चालला असल्याचे त्यांनी म्हटले. विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर अंकुश नसल्याने पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले.