![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । पुढील महिन्यात साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या दिवशी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकृत कत्तलखान्याशिवाय कुठेही कुर्बानी दिली जाऊ शकणार नाही. केंद्र सरकारने तसे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. बकरी ईदला लोक सार्वजनिक ठिकाणी पशूंची कुर्बानी देणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असेही राज्यांना सांगण्यात आल. कुर्बानी घरांत अथवा खुल्या ठिकाणीही देता येणार नाही. केंद्राने म्हटले की, पशूंना वाहनांत ठासून भरून नेले जाते, असे नेहमीच दिसत आहे. ही त्यांच्याबाबतची एक प्रकारे क्रूर वागणूकच आहे. अशा प्रकरणांत संबंधित लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाने सर्व राज्यांना लिहिले आहे की, बकरी ईदला उंटाची कुर्बानी दिली जाऊ नये. देशात भोजनासाठी प्रतिबंधित पशूंच्या श्रेणीत उंटाचा समावेश आहे. पण अनेक ठिकाणी उंटाची कुर्बानी दिली जाते. त्याशिवाय ज्या राज्यांत गोहत्या हा गुन्हा आहे, तेथे गाय आणि वासरांची कुर्बानी दिली जाऊ नये. राज्यांना सांगण्यात आले आहे की, कुठल्याही गाभण जनावराची कुर्बानी दिली जाऊ नये. ज्या पशूंचा गर्भ ३ महिन्यांपेक्षा कमी अवधीचा आहे, त्यांची कुर्बानीही पशुवैद्यकीय डॉक्टरांतर्फे जारी फिटनेस सर्टिफिकेटविना देता येणार नाही.