महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह सुरतला मुक्कामी असल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पेचप्रसंगातून हे सरकार बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
राजधानीत पत्रकारांशी बोलताना पवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत टिप्पणी केली. क्रॉस व्होटिंग झाले तरी फरक पडत नाही. सरकारे चालतात हा माझा गेल्या 50 वर्षांतला राजकीय अनुभव आहे, असे सांगत शरद पवार यांनी सरकार या पेचप्रसंगातून बाहेर पडेल असे नमूद केले. गेली अडीच वर्षे सरकार चांगल्या पद्धतीने चालले ही काहीजणांची पोटदुखी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्रीपद हा सर्वस्वी शिवसेनेचा विषय आहे असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे प्रकरणावर जास्त भाष्य करणे टाळले.महाविकास आघाडी सरकार कोसळले तर तुम्ही भाजपमध्ये जाणार का, या प्रश्नावर पवारांनी पत्रकाराचीच फिरकी घेतली. तुम्ही असा प्रश्न विचारूच कसा शकता. आम्ही विरोधी पक्षातही बसू शकतो, असे ते म्हणाले.