महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिक तसेच नाराज आमदारांशी संवाद साधला आहे. आमदारांना भावनिक साद घालून त्यांनी परत येण्याचे आवाहन केले आहे. तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी उद्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीत शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच बैठकीबाबतची अधिक माहिती राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. “आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्व मंत्री एकत्र आलो होतो. उद्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. शरद पवार यांची बैठक आहे त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे,” असे भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण सर्वांनीच एकले आहे. मात्र उद्या राष्ट्रावादीची बैठक बोलावण्यात आली आहे. सरकार धोक्यात आहे की नाही हे उद्याच्या बैठकीनंतर तसेच काही घडामोडी घडल्यानंतरच हे समजू शकेल,” असेदेखील दत्तात्रय भरणे म्हणाले.