![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्या वतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री आळंदी येथून श्रींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर दुपारी २च्या सुमारास पालखीचे विश्रांतवाडीत आगमन झाले. विविध राजकीय पक्षाच्या वतीने परिसरात स्वागताचे फ्लॅक्स उभारण्यात आले होते. महिलांनी रांगोळी काढल्या होत्या. अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. यादरम्यान लष्कराच्या वतीने फळ व पाणीवाटप वारकऱ्यांना करण्यात आले.
पुणे शहर पोलिसांच्या वतीने या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः या मार्गाची पाहणी केली. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे करण्यात आणल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वारकऱ्यांसाठी करण्यात आली होती. पालिका साफसफाई विभागाच्यावतीने सफाई कामगार नेमण्यात आले होते. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ नये याकरिता महावितरण विभागाच्या वतीने काळजी घेण्यात आली. तर येरवडा, खडकी, संगमवाडी या भागाकडे जाणारे मार्ग पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आले होते. दुपारी ४च्या सुमारास फुलेनगर येथील दत्त मंदिरात श्रींची पालखी विसाव्यास थांबली असताना भाविक भक्तांची दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे अजय सावंत व शीतल सावंत यांच्यावतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. फुलेनगर येथून संध्याकाळी ५च्या सुमारास पालखीचे पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज स्वराज्यप्रमुख श्री छत्रपती संभाजीराजे यांनी दिघी येथून वारकऱ्यासमवेत सहभाग नोंदविला होता. वारकऱ्यांची त्यांनी विचारपूस करून तब्बेतेची काळजी घेण्याचे त्यांना आवाहन केले.वारकऱ्यांना फराळाचे व छत्रीचे वाटप करण्यात आले. छत्रपतींशी संपर्क साधला असता ते म्हणाले वारीत सहभाग घेणे यासारखा दुसरा आनंद कोणता नाही. तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीबाबत ते म्हणाले की,शिवसेनेने जर या निवडणुकीत मला पाठिंबा दिला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आज राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता असली तरी पण त्यांची अवस्था सध्या तळ्यात मळ्यात अशी झाली आहे.