महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांच मनपरिवर्तन होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर शिवसेनेच्या बंडेखोर आमदारांच्या बंदोबसत्ता मोठी वाढ करण्यात आली आहे. हॉटेल रेडीसन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा हे बंडखोर आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांचं मनपरिवर्तन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे.
शिवसेनेचे आमदार मंगळवारपर्यंत सुरतच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे त्यांचं एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेलं गेलं. या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था ही गुवाहाटीमधील ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. यामध्ये गुलाबराव पाटील हे देखील आहेत. गुलाबराव हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिवसेना (Shivsena) आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराने मला समोर येऊन सांगावं, मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. केवळ मुख्यमंत्रीपदच नाही, तर मी शिवसेना पक्षप्रमुखपदाचाही राजीनामा देण्यास तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे.