महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : राज्यात लॉकडाऊच्या काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी तळीरामांनी मद्याची दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. अवैध मद्यविक्रीला ऊत आला असून, लॉकडाऊनच्या 22 दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सुमारे 924 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. परंतु, मद्यविक्री सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अनेक मद्यपींनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी समाज माध्यमांवरून केली आहे. त्याचा गैरफायदा अवैध मद्यविक्रेते घेत आहेत. राज्यात 24 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत अवैध मद्यविक्रीचे 2593 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दररोज सुमारे 42 कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.
पंजाब, केरळ या राज्यांमधील सरकार मद्यविक्री काही प्रमाणात सुरू करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मद्य उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, मद्यपींची गर्दी झाल्यास कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतरही लगेच मद्य विक्री सुरू होणार नसल्याचे समजते.
मद्याचे उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या तरी मद्यविक्री सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नाही.
– दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री
संपूर्ण राज्यातील मद्यविक्रीसंदर्भात निर्णय होईल, कुठल्या एका जिल्ह्यासंदर्भात विचार केला जाणार नाही. मद्यविक्री सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
– कांतीलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग