कळंब नगरपालिका निवडणुक:-गल्लोगल्ली भेटु लागले भावी नगरसेवक ; सोशल मीडियावर तर वार्ड आणि विजय सुध्दा फिक्स

 379 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । सलमान मुल्ला । उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच दृष्टीने मोठी नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब नगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा सुटल्यामुळे कळंब शहरात गल्लोगल्ली भावी नगरसेवक अध्यक्ष यांची गर्दी पाहायला मिळत आहे..

निवडणुकीसाठी उतावळलेल्या इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शहरातील वॉर्डात हे स्वयंघोषित उमेदवार सक्रीय झाले आहेत. दररोज आपल्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली असली, तरी त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. सध्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हॉट्स अपवर अनेकांना शेकडो मेसेज मनात नसतानासुद्धा वाचावे लागत आहेत.

निवडणुकीतील इच्छुक आता विविध कार्यक्रमांचे आयोजन करून तुमच्या सुख-दु:खात सहभागी असल्याचा देखावा करीत गल्लोगल्ली फिरत आहेत. कोणत्याही पक्षाचे राज्य पातळीवरील नेते या भागात आले असता, संबंधित इच्छुक त्यांच्यामार्फत मनधरणी करण्याचा प्रयत्नही करीत आहे. सकाळीच गुडमॉर्निंग ,नमस्कारचा मेसेज व्हॉट्स अपवर झळकत असल्याने नागरिक कमालीचे हैराण आहेत.

मागच्या वेळेस निवडणुकीत हारलेले उमेदवार नवनवीन आयडिया वापरीत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, तर नवीन विविध पक्षांचे कार्यकर्ते तर कधी निवडणूक येईल, इतके उतावीळ झाले आहेत. पैसा कितीही गेला तरी चालेल, पण निवडणूक लढविणारच असा इरादा देखील अनेकांनी बांधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *