शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी ; एकनाथ शिंदेंसह 12 बंडखोर आमदारांना अपात्र करा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । शिवसेनेने आज अखेर पक्षशिस्त न पाळणाऱया आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विधानसभा पक्षप्रतोदांच्या पत्रानंतरही शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने तसेच गैरहजर राहण्याचे योग्य कारण न दिल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. तशी याचिकाच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी आज विधानसभा उपाध्यक्षांना सादर केली.

शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतल्यानंतर या भेटीवेळी उपस्थित असलेले शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांनी याविषयीची माहिती पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक बुधवारी 22 जून रोजी ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावण्यात आली होती. याविषयीचे पत्र शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांनाही पाठवले होते. बैठकीला उपस्थित राहता येत नसेल तर त्याचे योग्य कारण कळविण्यात यावे, अन्यथा अपात्रतेची कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले होते. मात्र या पत्रानंतरही अनेक आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. काही आमदारांनी उत्तरे दिली, मात्र काही आमदारांनी योग्य कारण दिले नाही. तर काहींनी नोटीस देण्याचाच अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे विधिमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि संविधानानुसार यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आम्ही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले आहे. त्यात 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केली असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *