नारायण राणे म्हणाले “त्यांच्या केसाला धक्का तर …”

 42 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. बंडखोरीची किंमत मोजावी लागेल, असं सांगितलं आहे. सरकार अल्पमतात आहे की नाही हे विधानसभेत ठरेल, विधानसभेत जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा स्पष्ट होईल हे सरकार बहुमतात आहे, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आमदारांना धमक्या देत असल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे.

“माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.”, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.

“संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.”, असंही नारायण राणे यांनी ट्वीट करत सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *