Eknath Shinde:शिवसेनेला आणखी एक धक्का? आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे गटाकडून आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपच्या नेत्यांच्या अरे ला कारे करणारे आणि चोख प्रत्युत्तर देणारे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून भास्कर जाधव यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. गेल्या काही तासांमध्ये शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होणाऱ्या आमदारांचा गायब होण्याचा पॅटर्न पाहता भास्कर जाधव यांनीदेखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारा आणखी एक आमदार कमी झाला आहे. ही शिवसेनेसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांतील शिवसेनेचे आमदार गळाला लावले होते. मात्र, कालपर्यंत मुंबई आणि तळकोकणातील आमदार शिवसेनेच्या गोटात होते. परंतु, काल मुंबईतील मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आज भास्कर जाधवही नॉट रिचेबल झाल्याने आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढत आहे. एकनाथ शिंदे गटात आतापर्यंत जवळपास ४५ ते ५० आमदार दाखल झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील हालचालींनाही वेग आला आहे. कालच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक तब्बल अडीच तास सुरु होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *