महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. ‘काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना (Corona) नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बैठकीत सांगितले. ( Uddhav thackeray Latest News In Marathi )
मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीत म्हणाले, ‘कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क घालणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे’.
कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लोकल रेल्वे प्रवासात मास्क सक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.राज्यातील कोरोना स्थितीबद्दल आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आहे. राज्यात साधारणतः २५ हजार रूग्ण आहेत. त्यापैकी ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
पाच टक्के रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सीजनवर एक टक्के तर आयसीयूमध्ये अर्धा टक्के रुग्ण आहेत. व्हेंटीलेटरवर आजमितीस २५ रुग्ण आहेत असे सांगून वर्धक मात्रा वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी नाशिक, पुणे, अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी देखील कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.