महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्याने पुण्यात डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने शेअर केलेल्या KRA रिपोर्टनुसार, या महिन्यात आतापर्यंत 86 हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. केईएम रुग्णालयात (KEM Hospital) अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत. शहरात डेंग्यूच्या काही तुरळक केसेस समोर येत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूचा उद्रेक झालेला नाही. त्याचे स्वरूप चक्रीय असल्याने, जुलैच्या मध्यात उद्रेक होण्याची शक्यता आहे. शिवाय, वारीनंतर (Pandharpur Wari) नारळाच्या शेंड्या आणि वाट्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. सध्यातरी पावसाच्या पार्श्वभूमीवर ही चिंता आहे, असे केईएमतर्फे सांगण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात. एकाच ठिकाणी सात दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साचून राहिल्यास ते डेंग्यूच्या डासांची पैदास करण्याचे ठिकाण बनते.
पुणे महानगरपालिकेने या वर्षी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांबद्दल, पीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आम्ही भौतिक, रासायनिक आणि जैविक उपाययोजना करत आहोत. आम्ही आउटडोअर फॉगिंग आणि घरांतही फवारणी केली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यू पसरू शकतो, तेथे आम्ही विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन आखत आहोत. याशिवाय, रुग्णांच्या वाढीवरही आमचे लक्ष असणार आहे, असे सांगण्यात आले.
घराबाहेर पाणी साचल्यास, खड्डे बुजवण्यासाठी अभियांत्रिकी विभागाची मदत महापालिका घेते. यासोबतच पाण्यातील गाळ आणि घाणीतही डासांची पैदास होते. त्यांची साफसफाई करण्यासाठी ड्रेनेज विभागाची मदत पीएमसी घेते. मुसळधार पावसाने पाणी तुंबण्याची समस्या सतत वाढत आहे. मुसळधार पावसानंतर धोका वाढतो. त्यामुळे पालिकेचे यावर लक्ष असणार आहे.